नाशिक - दिंडोरीच्या मॅकडॉल मद्य कंपनीतून मद्य घेऊन नांदेडच्या दिशेने निघालेल्या ट्रकला चोरट्याने पळवल्याची घटना विंचूर औद्योगीक वसाहतीच्या परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ट्रकसह चार चोरट्यांना अटक केली आहे.
अशी घडली घटना
बुधवारी मध्यरात्री मॅकडॉलमधून मद्याने भरलेले जवळपास 950 बॉक्स घेऊन ट्रक नांदेडच्या दिशेने निघाला होता. हा ट्रक निफाड तालुक्यातील शिवरे फाट्याजवळ आला असताना, चारचाकीमधून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने चाकूचा धाक दाखवून चालक आणि क्लीनर यांना वाहनातून उतरून दिले, तर अन्य दोघांना ट्रकमध्येच डांबून ठेवण्यात आले. काही अतंरावर ट्रक नेल्यानंतर त्या दोघांना देखील ट्रकमधून उतरून देण्यात आले. या प्रकरणी चालकाने निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चार आरोपींना अटक करण्यात यश
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रकचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी केली. अखेर पोलिसांच्या शोध मोहिमेला यश आले असून, पोलिसांनी विंचुर औद्योगीक वसाहतीत असलेल्या आईस फॅक्टरी परिसरातून चार चोरट्यांसह हा ट्रक ताब्यात घेतला आहे. सचिन अर्जुन वाकचौरे, इरफान याकूब मोमीन शरीफ, अब्दुल शेख आणि अरबाज नाझिर काझी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.