नाशिक - साडेतीन शक्तीपिठापैकी आद्यपीठ संबोधले जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासन सर्तक झाले आहे. सप्तशृंगी गडावरील संस्थानमधील एका ५१ वर्षे कर्मचाऱ्याला येवला येथील नातेवाईकाकडे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली. या कर्मचाऱ्याला कळवण मानूर येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
या कर्मचाऱ्याला चार दिवसापूर्वीच कळवण येथे पाठविण्यात आले आहे. सप्तशृंगी गडावर एका ५१ वर्षीय कर्मचारी पॉझिटीव्ह आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सदर कर्मचारी मागील आठवड्यात येवला येथे जाऊन आला होता. त्यास त्रास जाणवत असल्याने आरोग्य विभागाने त्याचे स्वॅबचे नमुने घेत तपासणीसाठी पाठविले होते.
आज त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. तो कर्मचारी पॉझिटीव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली. तसेच कळवण तालुक्यात आजपर्यंत चार रुग्णांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यापैकी दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता दोन रुग्णावर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.