नाशिक- शहरामध्ये आता आपल्याला फ्लॉवर पार्क पाहायला मिळणार आहे. गुलशनाबाद म्हणून नाशिकची पुसली गेलेली ओळख आता पुन्हा एकदा मिळण्याची शक्यता आहे. उद्योजक शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून हे फ्लॉवर पार्क उभारण्यात आले आहे.
फ्लॉवर पार्कचे उद्घाटन छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या फ्लॉवर पार्कमध्ये दीड लाखाहून अधिक कुंड्या आहेत. हे फ्लॉवर पार्क ८ एकर परिसरात पसरलेले आहे. देशी तसेच आंतरराष्ट्रीय फुलांचा समावेश या पार्कमध्ये आहे. युरोप, रशिया, फ्रान्स, हॉलंडमध्ये सापडणाऱ्या पिटुनिया, झिनिया, डायनथस, अंथरीयम, कोलयास यापासून ते भारतात असलेल्या सूर्यफूल, बोगणवेलीया, झेंडू, गुलाब, कमळ इथपर्यंत जवळपास ५ लाख विविधरंगी फुले या पार्कमध्ये ठेवण्यात आली आहेत. नाशिककरांना या माध्यमातून जगभरातील फुले पाहता येणार आहेत.
हे पार्क हिवाळ्यातील ४ ही महिने पर्यटकांसाठी खुले असणार आहे. या पार्कमध्ये प्राण्यांच्या प्रतिकृती तसेच सेल्फी पॉइंट देखील आहे. मोर, गाडी, घर, हार्ट अशा विविध थीमच्या माध्यमातून ही फुले सजवण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त पर्यटकांना या फुलांची इथंभूत माहिती मिळणार आहे. यासाठी अभ्यासू गाईड देखील ठेवण्यात आले आहेत. या माध्यमातून नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. पहिल्याच दिवशी फ्लॉवर पार्कमध्ये आलेल्या पर्यटकांना या पार्कने भुरळ पाडली आहे. बच्चे कंपनींना तर या फ्लॉवर पार्कमध्ये फुलांच्या जाती फुलांचा सुगंध आणि वेगवेगळी फुले पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे पार्कमध्ये बच्चे कंपनीने सकाळपासूनच धमाल-मस्ती केली.
अंजनेरी हिल्स, शुभम वॉटर पार्कच्या मागे ८ एकर जागेत उभारलेल्या या गार्डनचा आनंद नाशिककरांना तीन महिन्यांसाठी घेता येणार आहे. गेले वर्षभर त्यावर संबंधितांची मेहनत सुरू होती. आज ती मेहनत प्रत्यक्षात अवतरली आहे. चीनहून आयात केलेल्या दीड लाखांहून अधिक कुंडीत विविध जातीच्या रंगीबेरंगी लाखो फुलांचे केलेले संगोपन पर्यटकांचा नव्याने केंद्रबिंदू बनू पाहत आहे. त्यामुळे, या पार्कला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी विविध फुलांच्या जातींची माहिती करून घेतली व त्याचबरोबर नाशिकपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या फ्लॉवर पार्कला पर्यटकांचा मोठा उत्साह दिसून आला.
३ लाखांपेक्षा नानाविध प्रकारच्या रंगांच्या फुलांमध्ये साकारलेले पशू, पक्षी, डॉल, राइड्स, खाऊ गल्ली यांसारख्या गोष्टी नाशिककरांना खुणावत आहेत. नाशिकच्या हवामानाला पूरक ठरणाऱ्या फुलांच्या संगोपनवार विशेष भर देण्यात आल्याचे याठिकाणी दिसून आले. त्यामुळे भारतातील पहिले तर जगातील दुसरे मिरॅकल गार्डन म्हणून नाशिक फ्लॉवर पार्क नाशिककरांसाठी खऱ्या अर्थाने मेजवानी ठरणार आहे.
हेही वाचा- 'एकनाथ खडसेंबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील'