नाशिक - 71 वा प्रजासत्ताक दिन नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर साजरा झाला, यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंगा झेंड्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षभर आपण अभूतपूर्व अशा कोरोना महामारीशी लढा दिला, आणि आज आपण त्या संकटावर मात केल्याचे चित्र असून, नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. हे आशादायक चित्र आहे, जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिक, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अहोरात्र परिश्रम घेतले, त्यामुळेच आपण कोरोनावर नियंत्रण मिळू शकलो असल्याचे यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान जरी आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले असले तरी देखील कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्क वापरावे, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केले आहे.
कोरोना काळात 3.50 लाख मॅट्रिक टन मोफत तांदुळाचे वाटप
कोरोना काळात प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेंतर्गत 3.50 लाख मॅट्रिक टन मोफत तांदुळाचे वाटप करण्यात आले. मेपासून केशरी कार्डधारकांना देखील 1.50 लाख मेट्रिक टन धान्य वाटप करण्यात आले. प्रति महिना जवळपास 8.50 लाख मेट्रिक टन म्हणजे तिप्पट धान्य वितरित करण्यात आल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. कृषीपंप वीज जोडणी 2020 नुसार नाशिक जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार कृषीपंप धारकांची 1898 कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आली. कृषीपंप धारकांनी भरलेल्या 1141 कोटी थकबाकीतील ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर असे एकूण 686 कोटी रुपये कृषिपंप धारकांना पायाभुत सुविधा मिळण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचीही माहितीही यावेळी भुजबळ यांनी दिली.
भुजबळांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार
दरम्यान यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू, कोरोना काळात विशेष कार्य करणारे व्यक्ती, उत्कृष्ट ग्रामपंचायतीतील सरपंच यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - 72 Republic Day Celebration: राजधानी दिल्लीत राजपथवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा