येवला (नाशिक) - येवला शहरात चार दिवसापूर्वी छातीत दुखण्याचा कारणास्तव उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती झालेल्या मोरेवस्ती येथील रुग्णाचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल गुरुवारी सकाळीच पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे मृत्यूनंतर हा रुग्ण येवल्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. त्यामुळे येवला वासीयांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील मोरे वस्ती वरील 37 वर्षीय बांधकाम कामगार हा चार दिवसांपूर्वी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर कोरोना तपासणीसाठी त्याचे स्वॅब लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. बुधवारी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसऱ्यादिवशी गुरुवारी सकाळी त्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
सध्यस्थितीत येवला तालुक्यात नवीन कोरोनाबाधितांची संख्या 12 असून एक वेळ कोरोनामुक्त झालेल्या येवला शहरत हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच गुरुवारी या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने येवला शहरवासीयांसह तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना बाधितांच्या पहिल्या मृत्यूनंतर शहरात होणाऱ्या गर्दीवर प्रशासन काय पावले उचलते? हे पाहणे गरजेचे ठरत आहे. शहरात अनेक ठिकाणी गर्दी असते तर काहीजणांनी तोंडाला मास्क सुद्धा लावलेले नसतात तर फिजिकल डिस्टंसिंगचे पालनही केले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करावे व कोरोनाला येवला शहराला वाचावावे, असे आव्हान नेहमी प्रशासनाच्यावतीने करण्यात येते आहे.