दिंडोरी (नाशिक) - दिंडोरे तालुक्यातील लखमापूर फाट्यावरील राशी फर्टीलायझरच्या प्रदुषणामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
सोमनाथ वसंतराव काळोगे यांचे परमोरी शिवारातील गट क्रमांक १२१मधील ९० आर द्राक्षबागाचे नुकसान झाले आहे. कंपनीच्या प्रदुषणामुळे लखमापूरच्या मोहिणी वाल्मीक मोगल यांचे ६० गुंठे सोयाबीन, रामभाऊ घडवजे यांचे २० गुंठे सोयाबीन व सोमनाथ वसंतराव काळोगे यांची मिरची पॉली हाऊसमधील खराब झाली आहे. संजय काळोगे यांचे १ हेक्टर ४० आरवरील द्राक्षबाग व १८ एकर सोयबीनची पाने जळली आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर नुकसान झालेल्या शिवाराची पाहणी केली. यामध्ये कृषी तालुका अधिकारी डॉ. अभिजित जमधडे, कांदा द्राक्षसंशोधन पिंपळगाव बसवंतचे अधिकारी व राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिकारी जितेंद्र ठेमरे यांचा समावेश आहे. त्यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हा दिल्ला सल्ला
संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढायला पाहिजे. तुम्हाला खात्रीने नुकसानभरपाई मिळणार नाही. आम्ही कृषी अधिकारी फक्त पंचनामे करणार आहोत. हे पंचनामे वरील कार्यालयांना पाठविण्यापेक्षा आपल्या तालुक्यात विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्यामार्फत जिल्हाधिकारी साहेबांना नुकसानीची पाहणी करायला लावा, असा पाहणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उलट सल्ला दिला आहे. त्यांनी कृषी विभागाचीही बाजू मांडली. तसेच न्यायालयनीन कामासाठी कृषी विभागाचा कार्यालयाचा कागद आम्ही तुम्हाला देणार असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी काळोगे म्हणाले, की शेतकरी व कृषी विभागाचे एक नाते आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी वस्तुनिष्ठ पाहणीचा व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे, असे काळोगे यांनी सांगितले.