दिंडोरी ( नाशिक ) - दिंडोरी तालुक्यातील उमराळे (बु) मधील शिरसाठ वस्तीत, अज्ञात वाहनाच्या टपाला, लोंबकळणाऱ्या तारा अडकून तुटल्या आणि त्या तारा परिसरात राहणाऱ्या संजय शिरसाठ यांच्या घरावर पडल्या. तारा पडल्यानंतर जोराचा आवाज झाल्याने, शिरसाठ यांच्या घरातील सर्वजण जागे झाले आणि त्यांनी घराबाहेर पळ काढला. यामुळे त्यांचा जीव बचावला. ही घटना मंगळवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या तारामधून ३३ केव्ही दाबाचा विद्युत पुरवठा केला जातो.
मागील अनेक वर्षांपासून शिरसाठ वस्ती परिसरातील तारा खाली लोंबकळत आहेत. याबद्दल अनेकदा या परिसरात राहणाऱ्या लोकांनी महावितरणाकडे तक्रार देखील केली आहे. पण याची दखल महावितरणने घेतली नाही. मंगळवारी रात्री एका अज्ञात वाहनाच्या टपला त्या तारा अडकल्या आणि त्याला धक्का बसल्याने जिर्ण झालेल्या तारा तुटल्या. त्या तारा संजय सिरसाठ यांच्या घरावर पडल्या. संजय सिरसाठ यांचे घर पत्र्याचे असल्याने जोराचा आवाज आला. तेव्हा सिरसाठ यांच्या घरातील लोकांना काय झाले काही कळाले नाही. त्यांनी घराबाहेर पळ काढला. तेव्हा त्यांना घरावर विद्युत तारा पडल्याचे दिसून आले.
दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण अनेकदा या विषयी तक्रार करुन देखील महावितरण यावर काही मार्ग काढत नाही. दुर्घटनेत कोणाचा जीव गेल्यानंतर महावितरणाला जाग येणार का ? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडण्यास मिळालेल्या वेळेचा सरकारने फायदा करुन घ्यावा - मराठा संघटना
हेही वाचा - नाशकात कोरोना संशयित व्यक्तीचा ॲम्बुलन्समधून पळ काढताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू