नाशिक - काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्रिरश्मी बुद्धलेणींच्या डोंगरात दोन प्राचीन भिक्खू निवासगृहांचा शोध लागला होता. तर चार दिवसांपूर्वी आणखी एक प्राचीन भिक्खू निवासगृह शोधण्यात आले आहे.
लेणी कोरण्याची प्राथमिक अवस्था
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या या बातमीने नाशिकसह बुद्ध लेणींच्या वैभवात आणखी भर पडली आहे. हे प्राचीन भिक्खू निवासगृह अपूर्ण अवस्थेत असून, लेणी तयार करण्याची प्राथमिक अवस्था दर्शविते. त्यामुळे अभ्यासकांना लेणी कशी कोरतात? याचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे. स्थापत्यावरून ही लेणी त्रिरश्मी बुद्धलेणींपेक्षाही आधीची असेल असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे नाशिक मधील ही "सर्वात प्राचीन" लेणी असू शकते असे मत अतुल भोसेकर यांनी मांडले आहे.
नाशिक येथे सापडली सर्वात प्राचीन लेणी
नवीन सापडलेल्या 3 लेणींमुळे महाराष्ट्रातील सर्व बुद्धलेणींची कालमापन तारीख (chronology) बदलू शकेल, असा अंदाज लेणी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. या शोध मोहिमेत सामील असलेले राकेश शेंडे, वरिष्ठ संरक्षक सहायक अतुल भोसेकर (ट्रिबिल्स), सुनील खरे (लिपीतज्ञ), मैत्रेयी भोसेकर (पुरातत्त्वविद), सलीम पटेल (वरिष्ठ कर्मचारी ASI), साक्षी भोसेकर आदी या मोहिमेत सहभागी होते.
नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणींचे कालमापन अजून प्राचीन झाले आहे. पुरातत्वविद मैत्रेयी भोसेकर या लेणींचे दस्तऐवजीकरण करीत असून लवकरच ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला सादर केले जाणार आहे. येत्या २५६५ व्या बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सापडलेल्या या नवीन बुद्ध लेणींमुळे इतिहासप्रेमी, पुरातत्वविद आणि लेणी संवर्धकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्रिरश्मी लेण्यांच्या वरच्या थरावर ३ नवीन लेण्या शोधून काढल्या आहेत. लेण्यांचे निश्चितपणे जतन व संवर्धन केले जाईल तसेच रेखांकन व दस्तावेजीकरण कार्य केली जातील आणि लवकरच पाथवे व रेलिंगचे कामही केले जाईल. अस्तित्त्वात असलेल्या लेण्यांच्या थरापेक्षा आणखी काही गुहा अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणातर्फे संयुक्तरित्या सर्वेक्षण केले जाईल. सापडलेले भिक्खू निवासगृह हे निश्चितच त्रिरश्मी बुद्धलेणी समूहापेक्षा प्राचीन आहे, आणि लेणी कोरण्याची प्राथमिक अवस्था दर्शविते. ही लेणी २२०० वर्षांपेक्षा किंवा त्यापेक्षाही जुनी असावी. यामुळे संशोधकांना लेणी कोरण्याच्या पद्धतीचा अभ्यास करता येईल असे पुरातत्त्व विभागाच्या लीपीतज्ञ मैत्रेयी भोसेकर यानी सांगितले आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर एका टेकडीवर एकूण २४ त्रिरश्मी बुद्ध लेण्या
नाशिक-मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटा परिसरात एका मोठ्या टेकडीवर या त्रिरश्मी बुद्ध लेण्या आहेत. ह्या लेण्या प्राचीन आहेत. सुमारे २२०० वर्षापूर्वींच्या आहेत. लेण्यांमधील शिलालेखावरील कोरीव भाषा ही पाली आहे. त्यावरुन ही लेणी २००० वर्षांपूर्वीची असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्ती चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तूप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थंकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्ती, पाच पांडवसदृश मूर्ती, भीमाची गदा, कौरव मूर्ती, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्ती या सर्व लेण्यांत आहेत.