नाशिक - नाशिक नववर्ष यात्रा स्वागत समितीकडून ढोल ताशांच्या महावादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सैनिकांसाठी समर्पित होता. पंचवटी येथील यशवंत पटांगणावर हा कार्यक्रम पार पडला. यात नाशिक जिल्ह्यातील ३५ ढोल पथकांतील १५०० वादकांनी सहभाग घेतला होता.
नाशिक हे पूर्वीपासून ढोल पथकांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून ही संस्कृती वाढत आहे. या संस्कृतीचे जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग या ढोल पथकात सहभागी होतात. लय, ताल आणि नादाची अनुभूती नाशिककरांनी यावेळी अनुभवली. ढोल ताशांसोबत मुख्य ध्वज आणि २१ सहध्वज नाचवले गेले. ढोल आणि ताशांच्या माध्यमातून ब्रम्हनादाचा अनुभव नाशिककरांना घेता आला.
महिला ढोल वादकांनी वेधले लक्ष
कार्यक्रमाच्या सुरवातीला वाद्य पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी ढोल ताशा महासंघ महाराष्ट्राचे प्रमुख पराग ठाकूर, ज्येष्ठ ताशा वादक राजण घाणेकर, छत्रपती पुरस्कार विजेत्या श्रद्धा नालगवार, मोनिका आथरे, कब्बडी प्रशिक्षक शैलजा जैन, प्रफुल्ल संचेती आदी उपस्थित होते.
नाशिक शहरातील ढोल पथकांत मुलांसोबत मुलींचा देखील सहभाग बघायला मिळाला. नाशिकच्या तालुका भागातून आलेल्या ढोल पथकात देखील मुलींची संख्या जास्त दिसून आली. अशा कार्यक्रमातून महिला कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे.