नाशिक - त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तीनजण मंगळवारी बेपत्ता झाले. तीनपैकी एका तरूणीचा मृतदेह सापडला आहे. अन्य दोघांचा शोध घेणे सुरू आहे.
औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारे चार मुले आणि दोन मुली दुचाकीवर त्र्यंबकेश्वर येथे फिरण्यासाठी आले होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास यातील गिरधर, आकाश, व्यंकटेश आणि काव्या (सर्व राहणार तेलंगाणा) हे त्यांच्या सोबत आलेले अनुष्का, रघुवंशी, कोटी रेड्डी यांना धबधबा पाहू नका. पाणी खोल असेल, असे सांगून त्र्यंबकेश्वरकडे निघून गेले.
हेही वाचा - 'काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?'
दुसऱ्या दिवशीपर्यंत धबधब्यावर थांबलेले मित्र परत आले नाहीत. त्यांच्याशी काही संपर्कही झाला नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे गेलेले चारजण त्यांना शोधण्यासाठी दुगारवाडी धबधबा येथे गेले. तेव्हा त्यांना धबधब्याच्या पाण्यात अनुष्काचा मृतदेह तरंगताना आढळला. स्थानिक गावकऱ्यांनी त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी बेपत्ता रघुवंशी आणि कोटी रेड्डी या दोघांचा शोध सुरू केला आहे. त्यांच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आली. हे विद्यार्थी पाण्यात पोहण्यासाठी उतरले असावेत मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.