नाशिक - लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय नागरिक आता आपल्या गावी निघाले आहेत. परप्रांतीय नागरिक गावी जात असल्यामुळे नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे स्थानकावर होणारी कोरोना चाचणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने 14 एप्रिल रात्री 8 वाजेपासून ते 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली असून, यामुळे पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होईल या भीतीने परप्रांतीय मजुरांनी घराची वाट धरली आहे. यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, म्हणून ज्यांचे तिकीट आरक्षित आहे, अशाच प्रवाशांना सध्या रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच अनेक परप्रांतीय मजूर तर खासगी वाहानातून आपल्या कुटुंबाला घेऊन आपल्या गावी जात आहेत. या मजुरांमध्ये सर्वाधिक मजूर हे उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंडमधून आलेले आहेत.
कोरोना चाचणी बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाशिक महानगरपालिकेने रेल्वे स्थानाकावर प्रवाशांची प्राथमिक तपासणी सुरू केली होती. तसेच ज्या व्यक्तीला कोरोनाचे लक्षण असतील त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत होती, आणि जर कोणी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले तर त्यांना जवळच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येत होते. मात्र मागील दीड महिन्यांपासून कामगारांचा करार संपल्याने प्रवाशांची तपासणी बंद करण्यात आली आहे.
प्रवाशांची कोरोना चाचणी होत नसल्याने धोका वाढला
रेल्वे प्रशासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारमार्फत रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यास सागितलं आहे. मात्र तरी देखील त्याची अंमलबजावणी नाशिक जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडून होताना दिसत नाही. एकीकडे नाशिक कोरोनाचा हॉटस्पॉट झाले असतांना रोज शेकडो प्रवासी विना वैद्यकीय तपासणी शहरात दाखल होत आहेत.
हेही वाचा - सुप्रिया सुळेंची पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी व्हर्च्युअल सभा