नाशिक : यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या सर्वत्र पाऊस बरसत असून सततच्या बदलत्या हवामानामुळे द्राक्षासह कांदा पिकांना देखील फटका बसत आहे. अक्षरशः कांद्याला महागडी औषधे फवारणी करून कांदा पीक जगवले. मात्र अवकाळीने मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे नुकसान देखील केले आहे. त्यातून उरला सुरलेला कांदा शेतकऱ्याने साठवला आहे. मात्र हा साठवलेला कांदा देखील खराब होऊ लागला. त्यामुळे अक्षरशा कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यावर येत आहे.
कांद्यावरील खर्च वाया : लाखो रुपये खर्च करून मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले. मात्र सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे कांदा पिक शेतातच खराब करून टाकले. साठवून ठेवलेला कांदा आता सतत पडत असलेल्या पावसामुळे खराब होऊ लागला आहे. अक्षरशा काही ठिकाणी कांदा जनावरांपुढे टाकण्याची वेळ देखील शेतकऱ्यांवर येत आहे. 70 ते 80 टक्के साठवणूक केलेला कांदा खराब होऊ लागल्याने अक्षरशः फेकून देण्याची वेळ येवला, निफाड तालुक्यातील शेतकऱ्यावर येत आहे.
वर्षभराच्या अर्थचक्राला ब्रेक : शेतकऱ्याचा उन्हाळा कांद्यावर वर्षभराचा अर्थ चक्र फिरत असते. मात्र या अर्थचक्र फिरवणाऱ्या कांद्यालाच सध्या ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पावसाने कांद्याचे नुकसान होताना दिसत आहे. त्यातच द्राक्ष पीक देखील मोठ्या प्रमाणात निफाड तालुक्यात घेतले जाते, मात्र ते देखील या पावसामुळे बळी पडत असल्याने आता कांदासह द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थचक्राला ब्रेक लागल्याचे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यात बघण्यास मिळत आहे.
41 मिलिमीटर अवकाळी पावसाची नोंद : मागील 30 दिवसात नाशिक जिल्ह्यात 41 मिलिमीटर इतका अवकाळी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच 15 तालुक्यांमध्ये पाऊस झाला. यामुळे 37 हजार 931 हेक्टर वरील पिकांची हानी झाली. यात सर्वाधिक 30 हजार 256 हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच 2 हजार 645 हेक्टरवरील द्राक्ष बागाही उध्वस्त झाल्या आहेत. यासोबतच पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील तालुका निहाय बाधित शेतकरी : मालेगाव 1 हजार 466, सटाणा 34 हजार 645, नांदगाव 12 हजार 752, कळवण 1 हजार 634, देवळा 634, दिंडोरी 3 हजार 65, पेठ 356, इगतपुरी 1 हजार 969, त्र्यंबकेश्वर 77, नाशिक 1 हजार 175, येवला 15 चांदवड 3 हजार 179, सिन्नर 637, निफाड 3 हजार 26 अशी नाशिक जिल्ह्यातील तालुका निहाय बाधित शेतकरी संख्या आहे. द्राक्ष 2 हजार 645 हेक्टर, कांदा 30 हजार 265 हेक्टर, गहू 723 हेक्टर, डाळिंब 997 हेक्टर, आंबा 500 हेक्टर, टोमॅटो 326 हेक्टर, बाजरी 226 हेक्टर, आंबा 500 हेक्टर, असे शेतीचे नुकसान झाले आहे.