नाशिक - येथील नाशिक रोड भागातील सराईत गुन्हेगाराची पूर्व वैमनस्यातून गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. बाबा शेख असे मृताचे नाव आहे.
नाशिकच्या डीजीपी नगर भागात बाबा शेख हा टिपू शेख याच्याबरोबर दुचाकीवरून नातेवाईकांना वडाळा गाव इथे भेटण्यासाठी जात होते. याबाबत तसा फोनही त्याने नातेवाईकांना केला होता. दरम्यान, त्याच्या मागून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांनी त्याच्यावर गोळी झाडली. यानतंर माझ्यावर गोळीबार झाल्याची माहिती त्याने स्वतः नातेवाईकांना दिली होती. पाठीत गोळी घुसल्याने जखमी बाबा शेख याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनीच त्याचा काटा काढला आहे का? याबाजूने उपनगर पोलीस तपास करत आहे. तसेच तो ज्या दुचाकीवर होता त्या दुचाकीचा चालक आणि पाठीमागुन आलेले दोघे असे तिघेजण या गोळीबारात सामील असल्याचे बाबा शेख यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार केला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
बाबा शेख याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर मारहाण, हत्या, लूट, चोऱ्या, नगरसेवकांना धमक्या देणे, दहशत पसरवणे, आदी. गुन्हे नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.