नाशिक - इगतपुरी तालुक्यातील मालूंजे येथे दाम्पत्यावर वीज पडून ते जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी चार वाजेच्या सुमारास घडली. लग्नासाठी पिंपळगाव घाडगा येथे आले असताना ही घटना घडली. लग्न आटोपल्यानंतर मालूंज्याला येत असताना अचानक जोरदार वादळी पाऊस विजेच्या कडकडाटासह आला. यावेळी दाम्पत्य पावसाच्या भीतीने आंब्याच्या झाडाखाली उभे होते आणि त्याचवेळी वीज पडली. यामध्ये मालुंजेवाडी येथील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली. वाडीवऱ्हेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तपासकार्य व पंचनामा करत पुढील तपास सुरू करण्यास सुरुवात केली.
आंब्याच्या झाडाजवळ त्यांच्यासह अन्य तिघेजण उभे होते - वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीचे नाव दशरथ दामू लोते (वय ३५) सुनीता दशरथ लोते (वय ३०) असे आहे. हे दोघे गिऱ्हेवाडी येथील एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते. वादळी पाऊस आल्याने पिंपळगाव घाडगा येथील गोपाळ किसन देवगिरे यांच्या शेतातल्या गट नंबर ७० मधील आंब्याच्या झाडाजवळ त्यांच्यासह अन्य तिघेजण झाडाखाली उभे होते. तितक्यातच आंब्याच्या झाडासह त्यांच्यावर वीज पडल्याने ते दोघेही या घटनेत जागीच ठार झाले. तर सोबत असलेल्या मुली तेजस्विनी लोते, सोनाली लोते या दोघींसह गिऱ्हेवाडी येथील आणखी एक युवक बाळू चंदर गिऱ्हे हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धामणगांव येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दुपारी ४ ते ५ च्या सुमाराला घडली.
मदत देण्याची मागणी - दरम्यान, या घटनेची माहिती समजताच माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले असून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे केली. यावेळी घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार, पोलीस हवालदार विलास धारणकर, भाऊसाहेब भगत, निलेश मराठे, तलाठी एस. एन. रोकडे यांनी भेट देऊन कार्यवाही केली. या दुर्घटनेत ठार झालेल्या दाम्पत्यास शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.