नाशिक - जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना दर सोमवारी एसीबी कार्यालयामध्ये हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने झनकर यांचा जामीन मंजूर केला आहे.
दर सोमवारी झनकर यांना ACB कार्यालयात हजेरी बंधनकारक -
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक केली होती. दरम्यान याप्रकरणी सोमवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज काही अटी शर्ती घालून देत मंजूर केला. प्रत्येक सोमवारी झनकर यांना एसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर त्यांच्या जामीन अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली.
9 लाख रूपयांच्या लाचेची मागणी -
दरम्यान, या प्रकरणातील वैशाली झनकर यांचे साथीदार शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांचादेखील जामीन अर्ज यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या आधी त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र, झनकर यांनी अटके पूर्वी पोलिसांना गुंगारा दिल्याने तसेच उपचाराच्या नावाखाली रूग्णालयात बहुतांश काळ रुग्णालयात घालवल्याने त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी करण्यात आली. तर झनकर यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. एका संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरीता राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी 6 जुलै 2021 ला शिक्षणाधिकारी वैशाली-वीर यांच्यासाठी 9 लाख रूपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. काही दिवसांनी तडजोडी अंती 8 लाख रुपये वैशाली झनकर यांनी मान्य केले. शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फ़त ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. तरी मात्र त्यांच्यावर निलंबनाची कारवाई कधी होणार, हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तान सोडू पाहणाऱ्यांना धार्मिक भेदभाव न करता आश्रय देण्याची गरज -तिस्ता सेटलवाड