नाशिक - वेळोवेळी सूचना देऊनही कोरोनाकाळात नागरिक विनामास्क फिरत आहेत. यापुढे मास्क न घालणार्यांना थेट पोलीस ठाण्यात नेत त्याठिकाणी त्यांना दिवसभर बसवा, असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलिस यंत्रणेला दिले आहेत. तसेच मास्क न घालणार्यांकडून पोलीस आणि महापालिका दोघांनीही दुप्पट दंड आकारावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, दिवाळीच्या खरेदीसाठी रस्त्यावर झुंबड उडत आहे. मात्र, कोरोनाचे संकट असताना नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. ते बघता विनामास्क फिरणार्यांना पोलीस ठाण्यात नेऊन दिवसभर बसवा. जेणेकरुन विनामास्क फिरणार्यांना कडक संदेश मिळेल. पुढील काळात कोरोनाची त्सुनामी येऊ शकते. येणाऱ्या कोरोनाच्या संभावीत त्सुनामीची आम्ही तयारी करत आहोत. महापालिकेकडे 3000 बेड रिकामे आहेत. तर ग्रामीण भागात 12 हजार 500 बेड उपलब्ध आहेत. नाशिकमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा दर आणि मृत्यूदरही कमी झाला आहे.
सध्या रिकव्हरी रेट 92 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानांतर्गत 62 लाख लोकांची तपासणी करण्यात आली. दिवाळीच्या फटाक्यांवर निर्बंध नसले तरी जनतेने काळजी घ्यावी. फटाक्यांच्या धुराचा फुफ्फुसांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. शाळा कॉलेज सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, अनेक शाळा कोव्हिड सेंटर म्हणून उपयोगात आणल्या जात आहे.
हेही वाचा - ...तर नाशिक अहमदनगरसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटेल- छगन भुजबळ
राज्यात पुरेसा अन्नसाठा -
रेशन दुकानांमध्ये पुरेसे अन्न धान्य आहे. मात्र, पंजाबमधील काही रॅक तिथल्या आंदोलनामुळे पोहोचल्या नाही. तरी अन्न धान्य कमी पडणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. केंद्र सरकारने फक्त कांदा निर्यात करण्याचे आदेश दिले आहेत. तर कांदा कुठे विकायचा? हा व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.
अणर्बची काळजी करु नका -
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची काळजी घेण्यास सांगितले आहे. याबाबत, छेडले असता राज्यपालांनी काळजी करु नये. अर्णब यांची योग्य ती काळजी घेतली जाईल. राज्यपाल छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच एस. टी. कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्न निश्चितपणे सुटेल. आत्महत्येचे पाऊल ज्यावेळी कर्मचारी उचलतात, तेव्हा प्रश्न गंभीरच असतो. लवकरच हा प्रश्न निकाली लागेल, असे त्यांनी एसटी कर्मचार्यांना आश्वस्त केले.