नाशिक - जीवन रुग्णालयाऐवजी मन्सूरा युनानी रुग्णालयात दाखल केले जात नसल्याने, संतप्त झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णवाहिका चालकास बेदम मारहाण केली, यामुळे आरोग्य सेवकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून मारहाणप्रकरणी या रुग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना जीवन रुग्णालयात तर प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना सामान्य रुग्णालयात ठेवलं जात आहे. तसेच, काही रुग्णांना मन्सूरा युनानी वैद्यकीय रूग्णालयात तसेच इतर मनपाच्या इतर रुग्णालयांमध्ये ठेवण्याचे नियोजन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
गुरुवारी पॉझिटिव्ह अहवाल मिळालेल्या एका रुग्णास जीवन रुग्णालय येथे रुग्णवाहिकेतून नेलं जात असतांना रुग्णाने जीवनऐवजी मन्सूरा युनानी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आग्रह धरला. मात्र, आम्हाला जीवन रुग्णालयामध्येच घेऊन जाण्याचे आदेश आहेत, अशी रुग्णाची समजूत काढण्याचा प्रयत्न रुग्णवाहिका चालकाने केला. मात्र, रुग्णवाहिका चालकाचे म्हणणे न ऐकता संतप्त झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाने चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. ह्या घटनेवरून आरोग्यसेवक कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित रुग्णाने केलेली मारहाण तसेच सेवकांना होत असलेल्या दमबाजीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयामध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
रुग्णवाहिका चालकाला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित रुग्णावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत. मात्र, अशा घटनांमुळे दिवसरात्र आपल्या जीवाची परवा न करता आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे.