नाशिक - देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातल्या लष्करी हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. देवळालीतील सप्लाय डेपोच्या मेजरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 15 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
29 वर्षीय असलेल्या आणि देवळालीच्या सप्लाय विभागात मेजर असलेल्या या अधिकाऱ्याला काही दिवसांपासून त्रास होऊ लागल्याने, त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाचा शिरकाव लष्करी छावणीत झाल्याचं समोर आले आहे.
दरम्यान, या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर 15 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. तर संपूर्ण लष्करी परिसर आता सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कॅन्टोमेन्ट हॉस्पिटलमध्ये ८० रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. तुर्तास २० बेडची व्यवस्था झालेली आहे. लष्करी आस्थापनाने जवान व अधिकारी यांच्यासाठी लष्करी रुग्णालयात तर नागरी विभागातील लोकांसाठी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.