नाशिक - मालेगाव शहरात कोरोनाने थैमान घातलं असून दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतो आहे. मालेगाव शहरात 62 जणांना कोरोनाची लागण झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 70 झाली आहे..
नाशिकपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रतिदिन वाढत असून, 17 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या अहवालात 14 संशयित रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आले. यामुळे आता मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 62 वर पोहचली असून त्यांच्यावर मालेगाव शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मालेगावात कोरोनामुळे आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
17 एप्रिल रोजी मिळून आलेल्या 14 कोरोनाबाधित रुग्ण हे मालेगाव शहरातील चंदनपुरी गेट, गुरूवर रोड, बेलबाग, हजर खोली, सिद्धार्थ वाडी, इस्लामपुरा, नायपूरा या भागातील असून या कोरोनाबाधित रुग्णांत एका नऊ वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे. प्रशासनने हे सर्व भाग सील केले असून या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मालेगावमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे बघून मालेगाव शहर सील करण्यात आले आहे. मालेगावमधून बाहेर जाण्यास व शहरात येण्यास मनाई कऱण्यात आली असून ठिकठिकाणी कडेकोट नाकेबंदी करण्यात आली आहे. शहरात लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
मालेगावसाठी नेमके आदेश काय आहेत -
मेडिकल ,हॉस्पिटल दिवसभर सुरु राहतील..
दूध व चारा पुरवठा करणारे विक्रेते जाऊ शकतात
गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सी सुरू राहतील
- अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील फक्त तीन पेट्रोल पंप सुरू राहतील..
भाजी विक्रेते आणि किराणा सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहतील
अन्न दान करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थानां प्रशासनाची परवानगी आवश्यक
ड्रोन कॉमेऱ्याद्वारे पोलीस करणार पेट्रोलिंग..