नाशिक - जिल्ह्यातील शेतकऱ्याने चार एकरवरील कोथिंबीरमधून १२ लाखांचे उत्पन मिळविल्याची बातमी समाज माध्यमात व्हायरल झाली. विनायक हेमाडे हे शेतातील मेहनतीमधून विक्रमी उत्पन्न मिळविलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील रहिवासी आहेत. मात्र, समाज माध्यमात दुसराच फोटो व्हायरल झाल्याने हेमाडे यांना त्रास सहन करावा लागला आहे.
शेतकरी विनायक हेमाडे यांना ४ एकरवरील कोथिंबिरच्या मोबदल्यात १२ लाख ५१ हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. खोडसाळपणे कुणीतरी दुसराच फोटो व्हायरल केल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केले आहे. शेतीमधून कसे उत्पन्न घेतले याची माहिती हेमाडे यांनी दिली. ते म्हणाले, की शेतात रासायनिक खतांचा वापर करत नाही. शेणखताचा वापर शेतात करण्यात येतो. यापूर्वी सुरुवातीला केवळ एक गाय होती. सध्या, १३ गायी आहेत. दररोज १०० लिटर दुधाचे उत्पादन घेण्यात येते.
समाज माध्यमात डोक्यावर साडेबार लाखांचे गाठोडे डोक्यावर घेऊन जात असलेला फोटो हा लाभार्थी शेतकरी विनायक हेमाडे यांचा नाही. समाज माध्यमातील तो फोटो खोडसाळपणातून व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. यामुळे, हेमाडे यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र मंगळवारी दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या बातमीसह फोटो प्रसिद्ध झाल्याने हेमाडे कुटुंबीयांना आपल्या मेहनतीचा अपमान झाल्याचे लक्षात आले. हेमाडे कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले.
बाजारपेठेत कोथिंबिरच्या भावात वाढ झाली आहे. त्यानंतर एका व्यापाऱ्याने हेमाडे यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी १२ लाख ५१ हजार रुपयांमध्ये कोथिंबिरीचा सौदा केला. त्या बदल्यात शेतकऱ्याला धनादेशदेखील दिला. शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज झाल्याची चर्चा परिसरात सुरू झाली.
महाराष्ट्रातील बळीराजा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडल्याचे चित्र सर्रास दिसते. मात्र या संकटांवर मात करत कोणत्याही बाजारभावाची अपेक्षा न ठेवता विनायक हेमाडे यांनी जमिनीत ४५ किलो कोथिंबिरीचे बियाणे पेरले होते. यात एक्केचाळीस दिवस पिकाच्या वाढीसाठी नैसर्गिक शेणखताचा वापर केला. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून अखेर तब्बल साडेबारा लाख रुपये मिळाले आहेत. विनायक हेमाडे यांच्या कोथिंबिरीच्या उत्पन्नाची संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चा होत आहे.