नाशिक - मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली. परंतू गेल्या सात वर्षात मोदी सरकारने दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत.सरकार सत्तेत आल्यापासून महागाई, इंधन वाढ, शेतकरी हमीभाव, रोजगार,आरोग्य सुविधा, या समस्या पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने, त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड, येथील काँग्रेस भवना बाहेर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात नाशिक जिल्हा काँग्रेसने परवानगी नसताना आंदोलन केले होते. या आंदोलनप्रकरणी मनाई हुकूमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या चाळीस जणांविरुद्ध सरकारवाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच पुढील कारवाई या नेत्यांवर केली जाणार आहे. कॉंग्रेसने या कारवाईचा निषेध केला असून पोलीसांनी विनाकारण कारवाई केल्याचे म्हणले आहे.
आंदोलनात दरम्यान सोशल डिस्टनसिंगचा फज्जा -
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील उपस्थित राहणार होते.परंतू त्यांना यायला उशीर झाल्याने १ तास आगोदर आंदोलन करण्यात आले. कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याच्या कारणाने जिल्हा कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलनाच्या वेळी कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळला नाही. तसेच कोरोना महामारीच्या नियमांचे पालन केले नाही. या कलमानुसार देखील पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी केलेल्या कारवाईचा काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी निषेध व्यक्त केला आहे.
हेही वाचा-....तेव्हा सरकारमधील मंत्री मोर्चे काढण्यात मग्न होते - देवेंद्र फडणवीस