नाशिक : नाशिकमध्ये तब्बल पाच वर्षानंतर सर्कस दाखल झाली आहे. चिमुकल्यांपासून अबालवृद्धांपर्यंत आकर्षण आणि करमणुकीचा खेळ असलेली एशियाड सर्कस नाशिकच्या डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर एशियाडने तंबू टाकला आहे. त्यामुळे आता नाशिकमधील बच्चे कंपनीसोबतच कुटुंबियांना या सर्कशीची मजा लुटता येणार आहे. या सर्कसमध्ये सुमारे 60 कलाकारांच्या विविध अंगभूत कला कसरती आणि जोकरांची हास्य धमाल येथे अनुभवता येणार आहे. मात्र जनावरांवरील बंदीमुळे सर्कसचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सर्कस मालकांनी सांगितले आहे.
साहसी खेळ : या सर्कसमध्ये अवघ्या दीड फुटाच्या काचेच्या पेटिमध्ये बंद होणारी वीस वर्षाची तरुणी, सायकलिंग, मौत का कुआ, 60 फुटी उंच झोक्यावर अंधारात झुलणार्या तरुणी, डान्स, फायर डान्स आणि नजरेला खिळवून ठेवतील, अशा आफ़्रिकन कलाकारांच्या जिम्नॅस्टिकच्या अंगभूत कसरती सोबतच अवघ्या दीड फुटी जोकरची हास्य धमाल येथे अनुभवता येणार आहे. एशियाड सर्कशीत भारतातील आसाम, बंगाल, ओरिसा, गुजरात, दार्जिलिंग या राज्यातील कलाकारांसोबतच नेपाळ आणि दक्षिण आफ्रिकेतील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. सुमारे दीड हजार लोक एकाच वेळी बसून हा शो बघू शकणार आहेत. यापूर्वी जयपूर, उदयपूर, इंदौर या ठिकाणी सर्कशीचे शो झाले आहेत.
या सर्कस राहिल्यात : कोरोना आधी देशात 100 सर्कस होत्या. मात्र सध्या एशियाड सर्कस, जेमिनी सर्कस, गोर्डन सर्कस, जम्बो सर्कस, रम्बो सर्कस, ग्रेट बॉम्बे सर्कस कार्यारत आहेत. उर्वरित सर्व सर्कस बंद पडल्या आहेत. सर्कस चालवण्यासाठी व्यवस्थपणाला दिवसाचा 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च होतो. सुरवातीच्या काळात लाखो रुपयांचा गल्ला जमविणारा सर्कस व्यवसाय सध्या नुकसान सहन करून चालवावा लागत असल्याचे व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. या खर्चात कलाकारांचे मानधन, मैदानाचे भाडे, सर्कस साहित्याचे, दळणवळ, जेवण, मंडप बांधणीसाठी मजुरांची मजुरी असा सरासरी दिवसाला 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत खर्च होतो.
रोज तीन खेळ : एशियाड सर्कसचे दररोज 1 ते 4, 4 ते 7 आणि 7 ते 10 असे तीनवेळा प्रयोग असणार आहेत. यात 28 प्रात्यक्षिके कलाकार सादर करणार आहेत. तिकीट दर 400, 250,150 रुपये आहे, अशी माहिती एशियाड सर्कसचे वरिष्ठ व्यवस्थापकांनी दिली. मी गेली 40 वर्षापासून सर्कस मध्ये कलाकाराचे काम करत आहे. आधीची सर्कस आणि आत्याच्या सर्कसमध्ये खूप फरक झाला आहे. आधी सर्कसमध्ये हत्ती, सिंह, घोडे, पक्षी, कुत्रे यांचे खेळ होत होते. तेव्हा फक्त जंगलात दिसणारे प्राणी प्रत्यक्षात बघण्यासाठी लहान मुलांची मोठी गर्दी होत होती. मात्र आता जनावरांवरील बंदीमुळे सर्कसवर बराच परिणाम झाला आहे आहे, असे ज्येष्ठ कलाकार बबली यांनी सांगितले.
जनावरांवरील बंदी उठवावी : आम्ही पहिल्यांदा सर्कस घेऊन नाशिकमध्ये आलो आहे. कोरोनामुळे खूप समस्या निर्माण झाल्या. सुरुवातीला शंभर सर्कस होत्या. मात्र आता देशात फक्त पाच सर्कस उरल्या आहेत. सरकारने सर्कस जिवंत ठेवण्यासाठी सर्कसमध्ये जनावरांना परवानगी दिली पाहिजे, त्यामुळे सर्कसला पुन्हा चांगले दिवस येतील. विदेशी कलाकारांना इतर देशांमध्ये चांगले पैसे मिळतात. त्यामुळे ते त्या ठिकाणी जातात. सरकारने सर्कसला सवलतीच्या दरात सुविधा द्याव्या, अशी मागणी सर्कस व्यवस्थापक गर्ग यांनी केली आहे.