नाशिक - राज्यात मागील काही दिवसात महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींचे विनयभंग होत असून सरकार गप्प असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे व गृहमंत्री देशमुख यांनी हा शिव छत्रपतींचा महाराष्ट्र असल्याचे त्यांच्या कृतीतून दाखवावे, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.
वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवर आरोप केले. राज्यात महिला सुरक्षा वार्यावर आहे. हे सरकार कधी ताळ्यावर येईल, त्याची आम्ही वाट बघतोय. महिला अत्याचाराविरुध्द आणलेल्या 'दिशा' कायद्याची रुपरेषा स्पष्ट नाही. मागील दहा दिवसात अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाच्या घटनेत वाढ होत आहे.