नाशिक - राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मिळून हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे इतिहासातील काही गोष्टी बाजूला ठेवून सरकारने काम केले पाहिजे. सतत काहीतरी बोलणे हे चांगले लक्षण नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत येणार नाही ही सर्वांची जबाबदारी आहे. सरकारमध्ये आपल्या पक्षासोबत इतर दोन पक्ष आहेत, याचे भान असणे गरजेचे आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले. तसेच याबाबत सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करू, असेही ते म्हणाले. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
इगतपुरीला खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वरप्रमाणे हिलस्टेशन करण्यासाठी अभ्यास केला असून त्याची पुस्तिका तयार झाली आहे. यासाठी सुधारणा आणि काम करण्याची अपेक्षा असून त्यासाठी २० कोटींची मागणी करण्यात आली आहे. यासाठी अर्थसंकल्पात निधी मिळाला नाहीतर पर्यटनामधून निधी घेऊ, असेही भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम सुचवला आहे. त्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांचे काय प्रश्न आहे? त्यावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये घरकुल, रखडलेले जलसिंचन, वीजपुरवठा, प्रलंबित प्रश्नांवर आढावा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल आढावा, पंतप्रधान घरकुल योजना, आदिवासी विकास योजना यासह विविध प्रश्नाचा आढावा घेण्यात येणार आहे.
आघाडी सरकारच्या काळात माजी खासदार समीर भुजबळ व माझ्या काळात तयार झालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षात रखडलेले आहे. त्यात प्रामुख्याने कलाग्राम, बोटक्लब, रिसॉर्ट, टुरिझम हब, वेलनेस हब, ट्रेकिंग युनिट, पर्यटनाची आणि उपयोगी असलेली काही काम आणि अपूर्ण असलेले काम आहेत. त्यावर निश्चितपणे विषय घेणार आहोत. तसेच विमान सेवेबाबत काही अडचणी आहेत त्यावर देखील बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.