नाशिक - साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगडावर कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांनी 'छबिना मिरवणूक काढली. या मिरवणुकीत राज्यभरातील तृतीयपंथी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. भगवतीच्या चरणी नतमस्तक होत आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्वांनी देवीला साकडे घालत मनोभावे देवीचा उदो उदो केला.
आदिमायेच्या दर्शनासोसाठी भाविकांची मोठी गर्दी
गडावरील शिवालय तलावावर स्नान करून सोबत आणलेल्या देवीच्या मूर्तींना शास्त्रोक्तपणे अभिषेक करत अर्धनारी नटेश्वर देवीचे पूजन करून छबिण्याला सुरुवात झाली. सप्तशृंगी माता, यल्लमा माता आदी देवींच्या मुर्तीस साज शृंगार करून, नैवेद्य, साडी-चोळी यांची छबिना मिरवणुक काढण्यात आली. शिवालय ते सप्तशृंगी देवी मंदीराच्या पहिल्या पायरीपर्यंत डफांच्या निनादात निघालेल्या या सवाद्य मिरवणुकीत भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या तृतीय पंथ्यांनी वाद्याचा तालावर ठेका धरत नृत्य केले.
भुतलावरील सर्व प्राणी मात्रांना सुखी ठेव
या छबिना मिरवणुकीचा शेवट पहिल्या पायरीवर होऊन देवीचे दर्शन घेवून सोबत आणलेली साडी-चोळी, नैवेद्य तसेच साज शृंगार देवीच्या चरणी अर्पण करतात. या भुतलावरील सर्व प्राणी मात्रांना सुखी ठेव, कोरोनाचे संकट दूर कर अशी प्रार्थना यावेळी तृतीयपंथीयांनी केली आहे. सप्तशृंग गडावरील किन्नरांची कोजागरी पौर्णिमा व छबिना मिरवणूक याविषयी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर महंत पायलगिरी यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा - जावेद अख्तर आले आर्यन खानच्या समर्थनार्थ, म्हणाले बड्या सेलिब्रिटींना लक्ष्य केलं जातंय