सटाणा(नाशिक)- शासनाच्या कोरोना संदर्भातील उपाययोजना व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता रूग्णांवर उपचार केल्या प्रकरणी जायखेडा येथील खासगी डॉक्टरवर जायखेडा पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
खाजगी वाहन चालकाच्या मृत्यू नंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार करणाऱ्या खाजगी डॉक्टरसह संपर्कातील ४६ व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत.
खासगी डॉक्टरने संसर्गजन्य लक्षणे असताना शासनाला न कळवता परस्पर उपचार केल्याचे स्पष्ट झाले. यावेळी त्या डॉक्टरने योग्य सुरक्षितता बाळगली नसल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोव्हिड 19 अधिनियम कायद्यान्वये डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे करत आहेत.