नाशिक - २०१४ पूर्वी देखील जिल्ह्यात विकासाची अनेक कामे केली. ती कामे यापुढील काळातही सुरू राहतील. त्यामुळे कुठल्याही विकासकामांना माझा विरोध नाही. तज्ज्ञांची मदत घेऊन प्रकल्प आणि योजना राबविल्या गेल्या पाहिजे. कारण, नागपूरची मेट्रो जाम झाली, मुंबईची मोनोरेल फसली त्यामुळे नाशिकचा विकास करताना येथील सौंदर्य आणि नाशिकपन टिकले पाहिजे, असे मत राज्याचे ग्रामविकास अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी सर्वांना सोबत घेऊन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून मी विरोध करणारा नाही तर विकास करणारा असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीतून जिल्ह्यात दीड हजार कोटींपेक्षा अधिक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दीड लाख खातेधारकांना होणार आहे. गेल्या कर्जमाफीत जिल्ह्यात ६५० कोटी रुपये आले. मात्र, प्रत्यक्षात २५० कोटींचे वाटप झाले. त्यामुळे आता दिलेल्या दिलेल्या कर्ज माफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच शिवभोजन थाळीचा प्रकल्प राज्यात सुरू करण्यात आला आहे. तो यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे आहे. तसेच मंत्रालयातील अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यामुळे जिल्ह्याचे स्थानिक प्रश्न सोडविण्याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे आले. त्यामुळे जिल्हा स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडविले जाऊ लागले आहेत.
हेही वाचा - आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्तीचा घाट - प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आचार्य अत्रे आणि त्यांच्या मराठा वृत्तपत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी संजय राऊत आणि त्यांचा सामना यांनी महत्त्वाची भूमिका राबविली, असेही ते म्हणाले. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, सत्तेपेक्षा विरोधात राहून किती फायदा होतो, असे सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजविण्याची गरज आहे. त्यामुळे हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल, असा चिमटा त्यांनी काढला. विकास कामांसाठी सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. दिल्लीत जेवढी सदन आहेत, त्या सर्वांमध्ये छगन भुजबळ यांनी बांधलेलं महाराष्ट्र सदन हे सर्वाधिक उठून दिसते. त्यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधींनी कामे करताना भुजबळ यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा - 'देशाच्या इतिहासातील वाईट काळ, स्थापनादिनी काँग्रेस काढणार संविधान बचाव रॅली'
यावेळी खासदार संजय राऊत, माजी मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ.नरेश गीते, मुख्याधिकारी एस.भुवनेश्वरी, आदी उपस्थित होते.