नाशिक - गेल्या चोवीस तासापासून इगतपुरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी साठले आहे. एकाच दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याचा फटका मध्य रेल्वेलाही बसला असून, कासारा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळली आहे.
कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळील बोगद्याबाहेर ऐन सकाळच्या सुमारास मातीचा मोठा ढिगारा थेट रेल्वे रुळावर पडला. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला समजताच रेल्वे विभागाच्या आपत्ती विभागाने घटनास्थळी धाव घेऊन सदरचा मातीचा ढिगारा बाजुला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या गाड्या एक ते दिड तास उशिराने धावत आहे.
एकाच दिवसात 180 मिलिमीटर पाऊस पडल्याने इगतपुरी शहर तसेच ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. यावर्षी 1 हजार 323 मिलीमीटर सर्वाधिक पाऊस हा ईगपुरी तालुक्यात पडला आहे.