नाशिक: राज्यात भाजप आणि शिवसेनेत चांगलेच शीतयुद्ध रंगले आहे, अशाच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद यांच्या पेहरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खुल्या समाजात उघडा नंगानाच, सार्वजनिक जागांवर स्वैराचार याविरोधातील माझा लढा सुरूच राहणार अशी भूमिका घेतली आहे. आता याच विषयाला धरून शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एका बॉडी बिल्डर महिलेला पारितोषिक देतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकत 'भाजप नेत्या चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच चालतो का?' असा प्रश्न केला आहे, यावर आता नाशिकच्या महिला बॉडी बिल्डर स्नेहा कोकणे पाटील आक्रमक भूमिका घेत कायदे यांना नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धा कळते का : मनीषा कायंदे यांनी जुना एका स्पर्धेतील फोटो पोस्ट केला आहे. मनीषा कायंदे यांनी राजकारणासाठी एका महिला खेळाडूचा फोटो पोस्ट करत तिची बदनामी केली आहे, ही बाब एक महिलेला शोभत नाही. बॉडी बिल्डर खेळाला शासनाची मान्यता आहे. त्यासाठी हा पेहराव करावा लागतो तसेच या खेळाला शिवछत्रपती पुरस्कार देखील दिला जातो. याची बहुतेक कल्पना मनीषा कायदे यांना नाही. त्यांनी ज्या प्रकारे एका महिला खेळाडूचा फोटो सोशल मीडियावर टाकत याला नंगानाच असे म्हटले आहे, हे अतिशय चुकीचे आहे. हा फोटो पोस्ट करताना महिला खेळाडूची परवानगी कायंदे यांनी घेतली होती. यातून तुम्ही आमच्या महिला खेळाडूंचा अपमान करत आहात. याबाबत तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे. लवकरच मी डॉ. कायंदे यांना नोटीस पाठवणार असल्याचे महिला बॉडी बिल्डर स्नेहा कोकणे पाटील यांनी म्हटले आहे.
चित्रा वाघ काय म्हटल्या : शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला ताई? खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धेचे असो. कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे? बाकी नंगानाच छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार नाहीच असे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. उर्फी जावेद प्रकरणानंतर चित्रा वाघ आणि त्यांनी घेतलेली भुमिका चांगलीच चर्चेत आहे. त्यावर त्यांच्यावर टीकाही होत आहे.