नाशिक - महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या दिवसागणिक वाढत चाललेला प्रादुर्भावामुळे महाविकास आघाडी सरकारला निशाण्यावर धरत शुक्रवारी नाशिकसह संपूर्ण राज्यभर भाजपच्या वतीने 'मेरा अंगण मेरा रणांगण' 'महाराष्ट्र बचाव आंदोलन' करण्यात आले. यावेळी नाशिक भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाजप पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात हातात बॅनर पकडून निषेध व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे सध्या आंदोलनाचे विविध पर्याय बंद झाले आहेत. मात्र, भाजपने या काळातही सरकारविरोधातील अनोख्या आंदोलनाचा पर्याय शोधून काढला. कोरोना बाबतीत राज्य सरकार कशाप्रकारे अपयशी ठरत आहे, हे दाखवून देण्यासाठी शुक्रवारी भाजपकडून महाराष्ट्रभर महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्यात आले. यात नाशिकमधील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेरही आंदोलन करण्यात आले. पाच जणांनी हातात बॅनर घेऊन ठाकरे सरकार विरोधात निदर्शने केली.
कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गोरगरिबांना वाजवी दरात अन्नधान्य देण्यात यावे तसेच शेतकरी, बारा बलुतेदार आणि असंघटित कामगारांसाठी राज्य सरकारने लवकरात लवकर 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे यांसारख्या अनेक मागण्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केल्या आहेत.
नाशिकचे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोप केला. तसेच कोरोनाला महाराष्ट्रात अटकाव आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशा सूचना केल्या आहेत.