नाशिक - मी प्रसिद्धीसाठी हा आरोप करत नसून, खरेच मला पैशांची ऑफर देण्यात आली होती. असा खुलासा काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे. पक्षातून फुटून निघण्यासाठी भाजपमधील एका कार्यकर्त्याने ही ऑफर केल्याचे खोसकर म्हणाले.
निकालानंतर मला २५ कोटींची ऑफर करण्यात आली होती. ही ऑफर करणारा माझाच जवळचा मित्र होता, असे खोसकर यांनी सांगितले. मागासवर्गीय समाजातील आमदार फुटतील असा प्रतिपक्षाच्या 'वरच्या' लोकांचा अंदाज असल्याचे खोसकर म्हणाले. त्यामुळे माझ्यासहीत देवळालीच्या आमदारालाही संपर्क केला होता. माझ्या घरी ऑफर घेऊन तिनदा लोक येऊन गेले, असे खोसकरांनी सांगितले. पण, हे लोक कोण होते हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
ही ऑफर आल्यानंतर खोसकर यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना याबाबत सावध केले. आपल्या पक्षातील आमदार फुटू शकतात अशी कल्पना त्यांनी नेत्यांना दिली. त्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांना जयपूरला नेण्यात आल्याचेही खोसकर यांचा दावा आहे. जयपूरमध्ये दुसऱ्या आमदारांनीही आपल्याला ऑफर आल्याचे मान्य केले असे हिरामण म्हणाले.
भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे. मागासवर्गीय आमदारांना प्रलोभन देऊन फोडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास हिरामण खोसकर यांनी व्यक्त केला.