नाशिक - कोरोनाचे कारण पुढे करुन हे सरकार हिवाळी अधिवेशन (Winter Session 2021) घेणार नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते. याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अधिवेशन होणारच आणि विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं देणारच, असे थोरात यांनी सांगितले. तसेच नागपूर विधानपरिषद पराभवाचे आत्मचिंतन करणार असल्याचेही थोरात म्हणाले.
- पक्षाला काही अडचणी निर्माण झाल्या हे मान्य - थोरात
बाळासाहेब थोरात हे इगतपुरीच्या एक दिवसीय दौर्यावर आले. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही. तसेच सुनील केदार आणि नाना पटोले यांच्या अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीका आशिष देशमुखांनी केली. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, आरोप प्रत्यारोपांपेक्षा आत्मचिंतन महत्वाचे आहे. त्या ठिकाणी पक्षाला काही अडचणी निर्माण झाल्या हे मान्य आहे. राहुल गांधी यांच्या सभेबाबत बोलताना थोरात यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट अजून संपले नाही. आपण काळजी घेत आहोत. असे वाटत होते की महिन्याच्या अखेरपर्यंत वातावरण निवळेल. बीएमसीने परवानगी नाकारली तर दुसरा विचार केला जाईल.
- नागपूर विधानपरिषद पराभव, आत्मचिंतन करणार - थोरात
नागपूर येथील निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाबाबत आत्मचिंतन करण्यात येईल. पराभवाला कुठलाही प्रकारची गटबाजी नसल्याचे स्पष्ट मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. नागपूरमध्ये झालेला पराभव हा उमेदवार बदलणे या सगळ्या गोंधळामुळे झाला असण्याची शक्यता आहे. परंतु, यामध्ये आता पक्षातर्फे आत्मचिंतन केले जाईल. पराभव नक्की कशामुळे झाला याचा शोध घेतला जाईल. सुनील केदार आणि नाना पटोले यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वाद होते असे नाही. विनाकारण काँग्रेसबाबत या अफवा पसरवल्या जात आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
- विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सट्टाबाजार -
विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सट्टाबाजार केला. त्यामुळे या निवडणुकीला थोडेसे वेगळे वळण लागले हे खेदजनक आहे. याबाबत पक्ष पातळीवरती पुढील पावले उचलली जातील. 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जी टीका केली आहे ती योग्य नाही. मागील दोन वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने अतिशय चांगले काम केले आहे. ते कार्य मांडण्याची विधिमंडळ अधिवेशन हीच योग्य जागा आहे. विनाकारण विरोधी पक्षांकडून काँग्रेससह सरकारमधील मित्रपक्षांवर आरोप केले जात आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहेत, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.