मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. तांबे यांनी माघार घेत, मुलगा सत्यजीत तांबेला उमेदवारी दिली. अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुधीर तांबेंनी सत्यजित तांबेंना महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करून टाकला. तांबे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण तापले.
काँग्रेसकडून तांबेंवर निलंबनाची कारवाई : काँग्रेसने तांबेंवर निलंबनाची कारवाई केली. दुसरीकडे तांबेंच्या पराभवासाठी शिवसेनेने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. शिवसेना व्यतिरिक्त कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाटील यांना अद्याप समर्थन दिलेले नाही. नाशिकमध्ये हा वाद धुमसत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी यावरून भाजपला फैलावर घेतले.
तिन्ही पक्षांना जागा जिंकणे सोपे : अशोक चव्हाण म्हणाले की, शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी नाशिक असो किंवा नागपूर जागेंबाबत अद्यापि निर्णय झालेला नाही. हा अंतिम निर्णय घेत असताना महाविकास आघाडी एकमताने जाहीर करेल. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत याबाबत बैठक होणार आहे. मात्र, नेत्यांमध्ये वाद-विवाद नसतात. त्यांच्या काही अपेक्षा असतात. ते पदासाठी इच्छुक असतात. कोणाला काय तर कोणाला काय हवे असते.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील फोडाफोडीमागे भारतीय जनता पार्टी : पक्षाकडून तिकीट मिळावे, एवढीच इच्छा असते. कुणी अपक्ष निवडणूक लढवायची असते, असे प्रश्न सामंजस्याने सोडवायचे असतात. शेवटी संबंधित जागा जिंकायची असेल तर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो. तिन्ही पक्षाकडून एकत्र प्रयत्न झाले तर संबंधित जागा जिंकणे सोपे होते. परंतु, नाशिक पदवीधर मतदारसंघातील फोडाफोडीमागे भारतीय जनता पार्टी आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.
माणसे फोडण्याची भाजपची रणनीती : माणसे फोडायची आणि मते घ्यायची, ही भाजपची आजवर रणनीती राहिली आहे. विधान परिषद निवडणुकीतही मते फोडण्याचे काम भाजपानेच केले आहे. हे काही लपून राहिलेले नाही. नाशिकमध्येसुद्धा तोच प्रयोग भाजपच्या वतीने काही प्रमाणात झाला आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. महाविकास आघाडीचादेखील असाच प्रयत्न राहील, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली.