नाशिक - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल भारताच्या बाजूने लागला. त्यांच्या केसचा पुनर्विचार होणे आणि त्यांच्या फाशीला स्थगिती मिळणे हा भारताचा नैतिक विजय असल्याचे मत निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर यांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तानने भारताविरोधात षडयंत्र रचले असून, पाकिस्तान हा दहशतवादी पुरस्कृत देश आहे. तसेच काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानने प्रोत्साहन दिल्याचे भारताने जगभरात उघड केले. म्हणून भारताला कोंडीत पकडण्यासाठी कुलभूषण हे हेरगिरी करत असल्याचे म्हणत त्यांना ताब्यात घेतल्याचे कॅप्टन अजित ओढेकर यांनी सांगितले.
महिनाभरात कुलभूषण जाधव भारतात परतण्याची शक्यता नाही
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला मिळालेली स्थगिती हा जरी मोठा निर्णय असला तरी पुढील महिन्याभरात कुलभूषण यांची भारतात येण्याची शक्यता नाही. त्यांची पुन्हा पाकिस्तानच्या मिलिटरी कोर्टात मोठ्या प्रमाणत चौकशी केली जाणार आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा लावून धरला पाहिजे की, कुलभूषण जाधव हे निवृत्त लष्कर अधिकारी असले तरी ते आता सामान्य नागरिक आहेत. जशी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्था आहे तशाच पद्धतीने कुलभूषण जाधव यांची सामान्य न्यायालयात केस चालवली पाहिजे. भारतातसुद्धा दहशतवादी पकडल्यानंतर त्यांची केस मिलीटरी कोर्टात न चालवता सामान्य न्यायालयात चालवली जाते. जर पाकिस्तानने असे केले तर सत्य बाहेर येईल आणि कुलभूषण जाधव हे निर्दोष सुटतील, असा विश्वासही निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर यांनी व्यक्त केला आहे.