नाशिक - लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची द्राक्षे ही बागेतच पडून आहेत. काही ठिकाणी विक्री झाली तर काही ठिकाणी वाहतुकीचा फटका बसल्यामुळे जवळजवळ जिल्ह्यातील १,४०० हेक्टर क्षेत्रावरील २८ हजार मेट्रिक टन द्राक्षे बागेतच पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर विक्री करण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. मात्र कृषी विभागाने शेतकरी ते ग्राहक थेट द्राक्षे किंवा इतर भाजीपाला विक्री करण्यासाठी परवानगी दिल्याने शुक्रवारी नाशिकमधून २० मेट्रिक टन द्राक्षे आणि काही भाजीपाला मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.
कृषी मंत्री दादा भुसे ही यावेळी म्हणाले, ही द्राक्षे आता शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. तसेच पुढील काळात शेतकऱ्यांचा माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची साखळी तयार करू, म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांनाही योग्य दरात भाजीपाला द्राक्षे खरेदी करता येतील. त्यामुळे या संकल्पने संदर्भात कृषी विभाग अग्रेसर राहील असे यावेळी कृषी मंत्र्यांनी सांगितलं.
कृषीमंत्री भुसे म्हणाले, १४०० हेक्टर क्षेत्रावरील २८ हजार मे. टन द्राक्षे शिल्लक होती. त्यापैकी २० मेट्रीक टन द्राक्षे पाठविण्यात येत आहेत. आज सात वाहने द्राक्षे व तीन वाहने भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यसाठी समन्वयाचे काम कृषी विभाग करत आहे. मागील काळात कोकणातील आंब्याला मार्केटमध्ये योग्य भाव मिळत नव्हता, अशावेळी कृषी विभागाने मध्यस्थी करून हा आंबा मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम केले. त्यामुळे आज आब्यांला चांगले दर मिळत आहेत.
