नाशिक - सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील काही दिवसात अयोध्येतील वादग्रस्त जागे संदर्भात निकाल येण्याची शक्यता आहे. या निकाल नंतर शहरात शांतता राहावी यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्वधर्मीय प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयोध्या निकालानंतर शांतता ठेवण्याचे, आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी उपस्थितांना केला. यावेळी सर्व धर्मगुरूंनी देखील आम्ही भारतीय नात्याने संविधानाच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करून, तसेच परिसरातील त्याविषयीचे प्रबोधन करू, असा विश्वास पोलीस आयुक्तांना दिला.
यावेळी धर्मगुरूंनी सोशल मीडियावर पोलिसांनी लक्ष देऊन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावे, अशी सूचना केली. निकालानंतर कोणीही फटाके फोडू नये, मिरवणूक काढू नये, आनंद व्यक्त करू नये याबाबत सुद्धा बैठकीत पोलीस आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले नाशिक शहर असून या शहरात शांतताप्रिय नागरिक राहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा विश्वासही पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी बैठकीत व्यक्त केला.
या बैठकीला दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज, भक्ती चरणदास महाराज, बडी दर्गाचे विश्वस्त हाजी सय्यद वसीम पीरजादा, नायब काजी एजाज सय्यद, रजा अकादमीचे रजा मकरानी, अशोक पंजाबी, हाजी जाकीर अन्सारी पिरजादा, शंकर बर्वे, करण गायकर आदींसह सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.