नाशिक - मुसळधार पावसामुळे नाशिकचे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. नाशिकच्या सखल भागात असलेल्या गंगापूर रोड भागातील नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. त्यातच, अनेक ठिकाणचे ड्रेनेज तुंबलेले असल्याने या पाण्याचा निचरा देखील होत नाही. त्यामुळे, हे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले आहे. तसेच अनेक वाहने पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नाशिक महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी ड्रेनेजची योग्य पद्धतीने साफ-सफाई न केल्याने पावसाचे पाणी ड्रेनेजमध्ये जाण्याऐवजी बाहेर येताना दिसून येत आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, या पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरांमध्ये शिरले आहे. तसेच, अनेक भागात या मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याने, रस्त्यांवरची वाहतूक बंद झाली आहे.