नाशिक - मनमाड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या नंतर संपूर्ण शहर कंटेनमेंट झोन (अतिसंवेदनशील) आणि बफर झोनमध्ये विभागून चार दिवसांचा शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आला होता. त्याआधी एक दिवस बाजार बंद असल्याने तब्बल पाच दिवसांनंतर आज मनमाड शहरातील
बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू झाली. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, सुरक्षित अंतर बाळगत खरेदी केल्यामुळे नागिरकांनी शिस्तीचे दर्शन घडवले.
पाच दिवसानंतर आज मनमाड शहरातील दुकाने सुरू होताच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. भाजीपाला मार्केटसह किराणा दुकानावर गर्दी झाली होती. शहरात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर 2 मे पासून शंभर टक्के लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आजपासून रोज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कापड, दारुची दुकाने, शूज यासह इतर जनरल शॉप वगळून जीवनावश्यक वस्तूंची इतर दुकानी सुरू राहणार आहेत. त्यात नागरिकांनी देखील कोरोनाचा धसका घेतल्याने विनाकारण फिरणाऱ्याची संख्या कमी झाली असून, प्रत्येक नागरिक आता आपली काळजी घेताना दिसत आहे.
सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या गावासाठी दुधाच्या दुकानांची वेळ कमी पडते ती वेळ वाढवण्याची मागणी सामान्य जनतेने केली आहे. प्रशासनाने याबाबत अधिक विचार करून सकाळी आणि सायंकाळी दूध डेअरीची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. दुधाच्या डेअरीसाठी वेळ वाढून देण्यासाठी अनेकांनी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यावरच निर्णय घेता येईल आम्ही सर्व मनमाड करांच्या सोयीसाठी पाऊल उचलले आहे, कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी प्रशासन घेईल असेही डॉ. दिलीप मेनकर म्हणाले.