सटाणा(नाशिक)- बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील ३२ वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी गेल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. या तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कात आलेले मित्र व उपचार करणारा स्थानिक डॉक्टर अशा ११ व्यक्तींना तालुक्यातील डांगसौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आलेय.
प्रशासनाने मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कातील १५ ते २० जणांना होम क्वारंटाईन केले आहे. मृत झालेल्या तरुणाच्या राहत्या घरापासून ३०० मीटरचा परिसर सील करण्यात आलाय. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मृत तरुण खासगी वाहन चालक असल्याने तो अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाची चिंता वाढली आहे. तो कुणाच्या संपर्कात आला तसेच त्याच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर जायखेड्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे या भागातील नागरिक बाहेर पडू शकणार नाहीत आणि बाहेरील नागरिकांनाही गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
जायखेडा येथील तरुण गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने तो गावातील खासगी डॉक्टरकडे उपचार घेत होता. बुधवारी, ११ जूनला रात्री त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.