नाशिक - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यांच्या डोळ्यातील आश्रू पुसण्यासाठी मी येथे आलो आहे. शेतकऱ्यांनी नैराश्य सोडून पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागावे. स्वतःच्या जिवाचे बरे-वाईट करण्याचा विचार देखील मनात आणू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. सरकार कोणाचेही असू द्या, बळीराजाला मदत करणार, असे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मनमाड येथे व्यक्त केले.
आदित्य ठाकरे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी व पाहणीसाठी आज नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा - नाशकात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
मागच्या वर्षी दुष्काळ आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या वर्षी शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला असून अतिवृष्टी झाल्याने मका, बाजरी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. त्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी तसेच त्यांना मानसिक बळ व नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आपण दुष्काळग्रस्त भागात दौरे करत आहोत, असेही ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा; ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
तर पत्रकारांनी आम्ही भावी मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलत आहोत का? असे विचारले असता, सध्या मी जनतेच्या कामात आहे, जी जबाबदारी मिळेल ती स्वीकारू, पण सध्या जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे उत्तर ठाकरे यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे विधानसभा गटनेते एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, संपर्क प्रमुख भाऊलाल चौधरी आदी नेते उपस्थित होते.