नाशिक - नाशिक महानगरपालिकेने सील बंद केलेली श्रीपाद मित्र मंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासिका आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलुप तोडून तो विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला. यावेळी आंदोलने करण्यात आली.
पुढील महिन्यात स्पर्धा परीक्षा होणार असून, विद्यार्थी वर्ग हा महापालिकेच्या अभ्यासिकामध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी येत असतो परंतु गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने नाशिक शहरातील मोठ्या प्रमाणात अभ्यासिकावर कारवाई करत अभ्यासिका सीलबंद केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अभ्यासिकावरील सील तोडले व थेट अभ्यासिका अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना खुल्या करून दिल्या. याप्रसंगी सागर शेलार, स्वप्नील बेगडे, नितीन पाटील, गौरी पवार, शर्वरी अष्टपुत्रे, सौरभ धौत्रे, आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर मिळकत जप्त प्रकरणावरून चांगलाच धुमसताना पाहायला मिळत आहे, मात्र पालिका प्रशासन ज्या न्यायालयीन याचिकेचा आधार घेत शहरातील अभ्यासिका सील करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्या याचिकेत मात्र मिळकती जप्त करण्याची मागणी नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढे पाठोपाठ नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त राधाकृष्ण गमे हे देखील अडचणीत आले आहेत.