नाशिक - बुलेट दुचाकीचे आकर्षण असल्याने गुजरात येथील एका तरुणाने नाशिक शहरातून एक दोन नव्हे, तर तब्बल नऊ बुलेट चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बुलेट चोराला नाशिक पोलिसांनी सापळा रचत नंदुरबार येथून अटक केली आहे.
हेही वाचा - नाशिकमधील डॉ. झाकीर हॉस्पिटलमध्ये २२ रुग्ण दगावले, ऑक्सिजनच्या टॅंकमधून झाली होती गळती
बुलेट दुचाकीचे विशेष आकर्षण असल्याने करायचा चोरी
बुलेट दुचाकी ही युवा पिढीमध्ये सर्वाधिक आकर्षण असलेली दुचाकी म्हणून ओळखली जाते. आणि याच बुलेटच्या आकर्षणापायी मूळचा गुजरात येथील रहिवासी असलेला विकी पाटील या तरुणाने नाशिक शहरातून तब्बल नऊ बुलेट दुचाकी चोरल्याची घटना समोर आली आहे.
सापळा रचत नाशिक पोलिसांनी संशयिताला केली नंदुरबारमधून अटक
नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमधून बुलेट दुचाकी चोरीला जात असल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत होत्या. याची गांभीर्याने दखल घेत नाशिक शहर पोलिसांनी या चोरट्याचा तपास सुरू केला. यात भद्रकाली पोलीस ठाणे परिसरात हा संशयित बुलेट चोरी करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला आणि याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी आपली तपास सुत्रे फिरवत आरोपी विकी पाटील याला नंदुरबारमधून सापळा रचत ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस तपासात संशयित विकी याने नाशिकच्या मुंबईनाका, भद्रकाली, पंचवटीसह धुळे आणि गुजरातच्या सुरत येथून देखील दुचाकींची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.
10 लाख 80 हजरांच्या 9 बुलेट गाड्या पोलिसांनी केल्या जप्त
पोलिसांनी चोरट्याकडून 10 लाख 80 हजार रुपये किमतीच्या नऊ बुलेट गाड्या जप्त केल्या आहेत. विकी पाटील हा शहरात दाखल होऊन हॉटेलमध्ये वास्तव करायचा आणि शहरातील विविध भागात जाऊन रेकी केल्यानंतर तो बुलेट गाड्यांची चोरी करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नाशिक गुन्हे शाखेचे युनिट एकच्या पथकाने मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावत त्याला ताब्यात घेतले असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - राम नवमी : आळंदीत फुलांच्या आराशीत श्रीरामाची प्रतिमा