नाशिक : जल प्रदूषण रोखण्यासाठी महानगर पालिकेने पुढाकार घेतला असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नव्या मार्गदर्शन सूचनाचा आधार घेत नाशिक महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गणेश मूर्तीकारांना वेळोवेळी मूर्तीमुळे होणारी हानी या विषयावर मार्गदर्शन केले आहे. मूर्तीकाराने प्रामुख्याने शाडूच्या मूर्ती उत्पादनावर भर द्यावा असे आवाहन केले आहे, आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची कोणी गुप्तपणे विक्री करत असल्यास कारवाई केली जाणार आहे.
याआदेशाचे पालन करण्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासनानाने पालिका हद्दीत यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना गणेशोत्सव व नवरात्र उत्सवाच्या काळात बंदी घातली आहे. केवळ मुर्तीच्या वापरावरच नाही तर अशा मूर्तीची निर्मिती, त्याच बरोबर मुर्तींची आयात तसेच साठ्या करणाऱ्यावर देखील बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पालिकेच्या वतीने थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
नाशिक महानगरपालिका प्रशासन आता पासूनच सतर्क झाले आहे, पालिकेची परवानगी न घेता प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशमूर्ती, नवरात्र उत्सव काळात देवीच्या मूर्ती विकणाऱ्यांवर आरोग्य विभागामार्फत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तयार करून कोणी गुप्तपणे त्याची विक्री करत असेल किंवा त्या नदीत विसर्जन करण्याचा प्रयत्न करीत असेल, अशा नागरिकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनांने सांगितले आहे.
यंदा गणेश,देवीची मूर्तीकार विक्रेत्यांना पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून निर्मिती आणि विक्रीची परवानगी घ्यावी लागणार आहे,तसेच पीओपीच्या मूर्तीची निर्मिती,आयात साठ्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव काळात नागरिकांनी पर्यावरण पूरक पाण्यात सहज विरघळणारे पूजा साहित्य आणि मुर्ती वापरल्या तर पर्यावरणाची हानी होणार नाही तसेच जलप्रदूषण टाळता येईल यासाठी पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
2022 मध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन नाशिक महानगरपालिकेने नाशिककरांना केलं होते त्याला प्रतिसाद देत नदी प्रदूषण होवू नये म्हणून शहरात तब्बल एक लाख 97 हजार 488 गणेशमूर्ती भाविकांनी दान केल्या होत्या. तर 144 मेट्रीक टन निर्माल्य नदी पात्रात न टाकता नाशिककरांनी ते पेटीत टाकले होते. नाशिककरांच्या मूर्ती व निर्माल्य दानामुळे जलप्रदूषणाबाबत जनजागृती वाढत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच महानगरपालिकेच्या फिरता तलाव उपक्रमातही नाशिककरांनी प्रतिसाद नोंदविला होता.