नाशिक- जिल्ह्यात दोन भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर चालत्या गाडीवर झाड कोसळून तीन शिक्षक जागीच ठार झाले. तर वाडीवरे येथे कंटेनर आणि कारच्या अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना घडली.
नाशिक कळवण रस्त्यावर दिंडोरी नजीक वलखेड फाट्यावर बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चालत्या आर्टिका वाहनावर झाड कोसळून झालेल्या अपघातात अलंगुन ता. सुरगाणा येथील तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वनीकडून नाशिककडे जाणाऱ्या (एम एच 15 एफ एन 0997ः या पांढऱ्या रंगाच्या मारुती आर्टिकावर वलखेड फाट्यावर वाळलेले झाड अचानक गाडीवर कोसळले. या अपघातात गाडीच्या मागील सीटवर बसलेले तीन शिक्षक दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय51) राहणार किशोर सूर्यवंशी मार्ग दिंडोरी रोड नाशिक रामजी देवराम भोये (वय 49) नाशिक नितीन सोमा तायडे( वय32 रा. रासबिहारी लिंक रोड नाशिक) जागीच ठार झाले. गाडीवरील पुढील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तीनही शिक्षक सुरगाणा येथील शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालय अलंगुन येथील असल्याचे समजते.

हेही वाचा-देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासूनच पॉर्न फिल्मचे शुटिंग, नाना पटोलेंचा आरोप
पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण करीत आहेत.

कंटेनर अपघातात चार ठार-
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी, की आज सायंकाळी नाशिकहून मुंबईकडे एक कंटेनर जात असताना डीवायडर तोडून समोरील बाजूस गेला व स्कोडा गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, स्कोडा गाडीतील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तर जखमींपैकी सोहिल अकील पठाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात संततधार पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.
हेही वाचा-जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार; राज्य सरकारचे एसीबीमार्फत चौकशीचे आदेश
अपघातग्रस्त व्यक्ती मुस्लिम बांधव असून आज ईद सणाच्या दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अपघाताची माहिती समजताच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात संबंधित अपघातग्रस्त व्यक्तींच्या नातेवाईक आणि मित्रांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.