नाशिक - महाराष्ट्रात यंदा देखील स्वाईन फ्लूने पुन्हा चांगलेच डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. कारण मागील ७ महिन्यात राज्यात तब्बल १८९ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक नाशिकमध्ये ३५ जण स्वाईन फ्लूने दगावले असून त्या खालोखाल नागपूरमध्ये २५ जणांचा बळी गेला आहे.
ही सर्व परिस्थिती बघता आज आरोग्य उपसंचालिका रत्ना रावखंडे यांच्या उपस्थितीत नाशिक विभागातील सर्व आरोग्य अधिकारी आणि खासगी डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. नाशिकच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये या सर्वांची एक कार्यशाळाच घेण्यात आली. मागील वर्षी देखील स्वाईन फ्ल्यूमुळे सर्वाधिक मृत्यू नाशिकमध्ये झाले होते. तर हीच परिस्थिती पुन्हा ओढावू नये, म्हणून शासकीय अधिकाऱ्यांसोबतच खासगी डॉक्टरांनाही योग्य त्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
नाशिक विभागात नाशिक आणि अहमदनगर हे दोन जिल्हे मोठे आहेत. याठिकाणी मागील काही वर्षापासून स्वाईन फ्लू व डेंग्यूची रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराबद्दल जनजागृती व्हावी आणि खासगी डॉक्टरांना स्वाईन फ्लू आजारावर योग्य निदान कसे करावे ? याकरता ही कार्यशाळा घेण्यात अल्याची माहिती रत्ना रावखंडे यांनी दिली.