नाशिक - राज्यात शेतकरी आत्महत्येची स्थिती गंभीर होत चालली आहे. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू, असे आश्वासन देऊन सत्तेत येणारे कोणतेच सरकार या आत्महत्यांना रोखण्यास अपयशी ठरत आहे. राज्यात सध्या सत्तास्थापनेचा गोंधळ सुरू असताना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांचा समोर आलेला आकडा धक्कादायक आहे.
दिंडोरी तालुक्यात गेल्या १० महिन्यात १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिंडोरीमध्ये शेतीसाठी पाण्याची स्थिती चांगली असताना येथील शेतकरी आत्महत्यांची ही स्थिती धक्कादायक मानली जात आहे. या तालुक्यात आत्तापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या कधीच झाल्या नव्हत्या, असे बोलले जात आहे. १ जानेवारी ते १ नोव्हेंबर २०१९ या दहा महिन्यांच्या कालावधीत १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
हेही वाचा - अवकाळीचा फटका; दिंडोरीत हतबल शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
तालुक्यातील पहिली आत्महत्या दि. २१-२-२०१९ रोजी साहेबराव पुंडलिक वडजे (मडकीजांब) यांनी केली होती. फेब्रुवारीत १, मार्चमध्ये १, एप्रिलमध्ये ४, जूनमध्ये ४, जुलैमध्ये २, ऑगस्टमध्ये २, सप्टेंबरमध्ये १ आणि ऑक्टोबरमध्ये १ अशा एकूण १६ आत्महत्या झाल्या आहेत.
विजय जगन्नाथ कदम (हातनोरे), गणेश विजय देशमुख (मोहाडी), गोरक्षनाथ उर्फ समाधान जाधव (निळवंडी), प्रकाश निवृत्ती बस्ते (शिंदवड), प्रविण धोंडीराम मेधने (बंधार पाडा), विलास युवराज जोपळे (चौसाळे), बाळासाहेब तुकाराम पूरकर (बंधारपाडा), लक्ष्मण गणपत वाघ (सारसाळे), रामनाथ पोपट जाधव (आवनखेड), चंद्रशेखर मधुकर बनकर (मोहाडी), शरद रामकृष्ण कदम (कोऱ्हाटे), चंद्रभान उत्तमराव संधान (चिंचखेड), दत्तात्रय देवराम पाटील (चिंचखेड), दशरथ बाळा मोगरे (मोहाडी), संजय भास्कर देशमुख (मोहाडी) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.