सटाणा - (नाशिक) - देवळा तालुक्यातील वासोळपाडा येथील माहेरवाशीण महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कात आलेल्या बागलाण तालुक्यातील वरचे टेंभे येथील चौदा जणांना अजमीर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई घाटकोपर येथील वयोवृद्ध महिला गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी बागलाण तालुक्यातील वरचे टेंभे येथील आपल्या नातेवाईकांकडे दोन दिवस मुक्कामी होती. सदर महिला आजारी पडल्याने तिला देवळा तालुक्यातील वासोळपाडा फुलेनगर येथील येथे मुलाकडे पाठवण्यात आले. यानंतर त्यांनी मेशी व लोहोणेर येथील खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अधिक उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
खबरदारी म्हणून या महिलेच्या संपर्कात आलेल्या बागलाण तालुक्यातील वरचे टेंभे येथील चौदा जणांना अजमीर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.