नाशिक - नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केल्याने कोरोना रुग्णांमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 83 टक्के वरून 90 टक्क्यांवर आले आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्या नंतर मागील चार दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट होण्यास सुरुवात झाली. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 83 टक्के हुन 90 टक्के इतके झाले आहे. तसेच सक्रिय रुग्णांचा आकडा 28 हजार हुन 18 हजारावर आला आहे. मागील 15 दिवसापासून शहरात करण्यात आलेल्या कडक निर्बंधाचे नागरिकांनी पालन केल्याने नव्याने येणाऱ्या कोरोना बधितांचा आकडा कमी झाला आहे.
मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात शहरात जवळपास एक लाख कोरोना रुग्ण वाढले. रुग्ण वाढू लागल्यानंतर पुरेशी बेड मिळत नव्हते, त्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटू लागले. रिकव्हरी रेट हा थेट 82.89 टक्क्यांवर पोहोचला होता. दरम्यान राज्य सरकारने लॉकडाऊन केल्यानंतर गर्दीवर नियंत्रण आले तसेच नाशिककर सजग झाल्यामुळे संसर्गाला आळा बसू लागला आहे. त्याचे सुखद परिणाम म्हणजे नवीन रुग्णांमध्ये घट होऊ लागली आहे.