नंदुरबार - गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'विरचक' धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. यामुळे नंदुरबार वासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यंदा पावसाळा सुरू झाला, पण पावसात मोठा खंड पडल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात आता केवळ डेड स्टॉक शिल्लक आहे. तसेच पावसाळ्याचे दोन महिने संपत आले, तरीही प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पण विरचक धरणात पाणीसाठा करणारी शिवन नदी अजूनही प्रवाही झालेली नाही. तसेच पुढच्या काळात कसा पाऊस होईल याची शाश्वती नाही. यामुळे नंदुरबार पालिकेला नाईलाजाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.