नंदुरबार - शेतात लागवड केलेले पपईचे पीक अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहादा तालुक्यातील गोदीपुर शिवारात ब्राह्मणपुरी येथील विजय पाटील या शेतकऱ्यांच्या शेतात ही घटना घडली आहे.
शहादा तालुक्यातील गोदीपूर, ब्रह्मणपुरी शिवरात पपईची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. पपईची रोपे तयार झाले असून लागवडीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील तयार रोपे एका अज्ञात माथेफिरूने कापल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरवर्षी अज्ञात माथेफिरू पावसाळ्यात केळी-पपई या भागात कापून उध्वस्त करीत असतात. यावर्षी ही पिके कापून फेकण्याचे सत्र सुरू झाले आहे.
गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर शहादा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे तयार झालेली पिके कापून ठेवण्यात आली होती. याबाबत शेतकरी विजय पाटील यांनी शहादा पोलिसात तक्रार दिली आहे. पिकांचे नुकसान करणाऱ्या माथेफिरुचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.